| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाचा टी-20 वर्ल्डकप स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरमध्ये यूएईत पार पडणार आहे. भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली नसून, ती पुढील महिन्यात होणार असल्याचे समजते.
भारतीय संघाची निवड करताना कर्णधार कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे प्रमुख वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहेत. त्यांची टी-20 वर्ल्डकपसाठी निवड होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेदरम्यान त्यांना विश्रांती मिळणार का? मोहम्मद सिराजच्या कसोटीतील कामगिरीचा टी-20 संघाची निवड करताना विचार करायचा का? युजवेंद्र चहल आणि रविंद्र जाडेजा यांच्यासह कोणत्या फिरकीपटूंना संधी द्यायची? याचा निवड समितीला विचार करावा लागणार आहेत.
टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि कर्णधार कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. तसेच लोकेश राहुलची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे शिखर धवनला संधी मिळणार की संघाबाहेर ठेवले जाणार? तसेच सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या मधल्या फळीतील दोन्ही फलंदाजांची निवड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.