मोहोर वाचविण्यासाठी धडपड
। अलिबाग । वार्ताहर ।
हवामान बदलाचा मोठा फटका दरवर्षी आंबा पिकाला बसत असून, यंदाही जिल्ह्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे. आंब्याचा मोहोर बहरू लागला आहे. मात्र, ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावाने आंबा मोहोर गळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आता आंबा मोहोर कसा वाचावायचा, या संकटात फळबागायतदार सापडले आहेत.
वर्षातून एकदाच उत्पन्न घेण्यात येत असलेल्या या फळबागांची निगा आणि मशागत शेतकरी करत असतात. आता आंब्याचा मोहोर बहरू लागला आहे. त्यामुळे शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा फळबागातुन चांगले उत्पन्न मिळण्याची आस शेतकर्यांना लागली आहे. मात्र, सद्यःस्थितीत ढगाळ वातावरण कोवळा आंबा गळून जाण्याची भीती निर्माण झाली. तसेच, वातावरणातील बदलामुळे आंबा मोहोरावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी आंबा मोहोर जळुन जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फळबागयतदारांची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकरी कृषी तज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेऊ लागले आहेत.
ऑक्टोबर ते मेच्या दरम्यान आंबा मोहोरावर, मोहोर करपा, भुरी आणि कोळशी खार यासारखे बुरशीजन्य आणि भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे या रोगाला आळा घालण्यासाठी कार्बेन्डॅझिम, थायोफेनिट, प्रॉपिनेब, ट्रायडिमेफॉन आणि बोर्डो या औषधाच्या मिश्रणाची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून फळबागायतदारांना देण्यात आला आहे.