आधुनिक झगमगाटातही पारंपरिक कंदिलांचा क्रेझ कायम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिवाळीचा प्रकाशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी उजळून निघाल्या आहेत. अलिबागसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये आकाश कंदील आणि फटाक्यांची दुकाने सजली असून, ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. आधुनिकतेच्या झगमगाटात विविध आकर्षक डिझाइनचे कंदील बाजारात दाखल झाले असले तरी पारंपरिक बांबू, कापडी आणि कागदी कंदिलांचा क्रेझ आजही कायम असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य ग्राहकांपासून महागड्या सजावटीची आवड असणाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी बाजारात विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.
दिवाळीचा सण शुक्रवारी (दि.6) सुरू होणार आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा विविध सणांच्या निमित्ताने घराघरांत रोषणाई, रांगोळी आणि पणत्यांची सजावट केली जाणार आहे. प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा उत्सव असलेल्या दिवाळीची चाहूल रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी दिली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कंदिलांच्या दुकानांसह नाक्यानाक्यावर फटाक्यांची दुकानेही सजली आहेत.
दिवाळी आणि आकाश कंदील यांचे नाते अनेक पिढ्यांपासून जपले गेले आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि सकारात्मकतेचा संदेश देणारी ही परंपरा नव्या स्वरूपातही तितक्याच उत्साहाने पुढे सुरू आहे. रंगीबेरंगी कापड, नक्षीकाम, भरतकाम आणि सजावटीच्या साहित्यापासून तयार केलेले स्टार, गोलाकार, षटकोनी, राजवाड्याच्या आकाराचे, मोरपिसांच्या नक्षीचे तसेच पारंपरिक चांदणी आणि पेशवाई शैलीतील कंदील बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टूनच्या आकारातील, तर आधुनिक घरांच्या सजावटीसाठी आकर्षक एलईडी लाइटिंग असलेले कंदीलही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बदलत्या काळानुसार कंदिलांच्या डिझाइनमध्ये मोठे बदल झाले आहेत. मात्र, बांबूपासून तयार केलेले आणि त्यावर आकर्षक रंगसंगती असलेले कागदी कंदील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या पारंपरिक कंदिलांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी मोठे आकर्षक कंदील, तर अंगण आणि बाल्कनीसाठी लहान कंदील खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे.
कंदिलांचे दर
साधे कागदी कंदील 50 ते 150 रुपये, मध्यम आकाराचे आकर्षक कंदील 150 ते 300 रुपये, बांबू व कापडी कंदील 200 ते 600 रुपये, तर विशेष सजावट असलेले मोठे आणि डिझायनर कंदील 700 ते दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. आधुनिक सजावटीच्या वस्तूंची बाजारपेठ विस्तारत असली तरी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या पारंपरिक आकाश कंदिलांची ओढ रायगडकरांमध्ये कायम असल्याचे बाजारपेठेतील चित्रातून दिसून येत आहे.






