| कर्जत | प्रतिनिधी |
शासनाकडून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची जी चर्चा सुरू आहे, त्याला कर्जतमधून कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध महसंघ, चर्मकार बहुजन महासंघ, आदिवासी कृती महासमिती, कर्जत तालुका वाल्मिकी समाज व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्यावतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून होऊन नंतर बाजारपेठेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. त्यांनतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी दिले आहे. उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडेल, बंधुभाव नष्ट होईल आणि घटनेने दिलेला समानतेचा अधिकार धोक्यात येईल. म्हणून आमची मागणी आहे की, उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेऊ नये. सध्याचे आरक्षण जसे आहे तसेच सर्व घटकांसाठी लागू राहावे. आम्ही या मागणीसाठी शांततामय मोर्चा आयोजित केला आहे. आमच्या भावनांचा आदर करून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, ही विनंती, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हे निवेदन तहसीलदारांसह कर्जतच्या पोलीस निरिक्षकांना देखील देण्यात आले आहे.







