| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
प्रतापगड हिंदवी स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक किल्ले प्रतापगड शुक्रवारी रात्री 367 मशालींच्या तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 17 व्या मशाल महोत्सवाने संपूर्ण गड परिसरात शिवशौर्याचा जागर घडवून आणला. मशालींचा लखलखता प्रकाश, भगव्या ध्वजाची शान, ढोल-ताशांचा निनाद आणि शिवरायांच्या जयघोषाने प्रतापगडाचे वातावरण शिवमय झाले. स्वराज्याच्या इतिहासाची आठवण जागविणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर एकामागून एक 367 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. रात्रीच्या अंधारात मशालींच्या प्रकाशाने उजळलेले गडाचे बुरूज आणि परिसराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. आकाशातील आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे सोहळ्याच्या उत्साहात आणखी भर पडली.
मशालींच्या प्रकाशात उजळलेला प्रतापगड, भगव्या ध्वजाची डौलदार शान आणि हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी गडाचा परिसर दुमदुमून गेला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच शिवप्रेमी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झाले होते. मशालींच्या उजेडात उजळलेला भवानी माता मंदिर परिसर आणि ऐतिहासिक गडाची पार्श्वभूमी यामुळे महोत्सवाचे दृश्य विशेष लक्षवेधी ठरला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या आठवणींनी भारलेल्या या वातावरणात उपस्थितांना स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची अनुभूती मिळाली. केवळ उत्सव साजरा करणे एवढाच या महोत्सवाचा उद्देश नसून, इतिहासाविषयी अभिमान आणि पुढील पिढीमध्ये स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा हेतू आहे. चंदू अप्पा उतेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही ऐतिहासिक परंपरा भविष्यातही अखंड सुरू राहावी आणि शिवरायांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, हीच या महोत्सवामागील भावना आहे. 367 मशालींच्या प्रकाशाने उजळलेला प्रतापगड, शिवभक्तांचा उत्साह आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर यामुळे यंदाचा मशाल महोत्सव संस्मरणीय ठरला.






