| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
पनवेल शहर आणि परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मोरबे गावातील पाटबंधारे विभागाच्या धरणातील पाण्याचा वापर पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी करण्यात यावा, अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मोरबे धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक हरेश केणी आणि नगरसेवक तुषार पाटील तसेच मनसे राज्य प्रवक्ते योगेश चिले उपस्थित होते.
पनवेल शहरासह परिसरातील लोकसंख्या वाढत असताना पाण्याची गरजही वाढत आहे. मात्र, सध्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. काही भागांत अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचे पर्यायी स्रोत शोधून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोरबे गावाजवळील पाटबंधारे विभागाचे धरण 1973 मध्ये बांधण्यात आल्याची माहिती असून, त्याची साठवण क्षमता सुमारे 3.22 दशलक्ष घनमीटर असल्याचे सांगितले जाते. हे धरण प्रामुख्याने सिंचनासाठी बांधण्यात आले आहे. मात्र, पनवेल परिसरातील सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता या धरणातील पाण्याचा काही भाग पिण्याच्या पाण्यासाठी वापरणे शक्य आहे का, याचा अभ्यास संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे.







