हजारो ग्राहकांना ‘फॉल्टी’ नोटीस; मीटर बदलण्यासाठी 3 हजारांची सक्त
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
कळंबोलीतील हजारो पाणी ग्राहकांना सिडकोकडून ‘फॉल्टी’ पाणी मीटरच्या नोटिसा बजावण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित मीटर बदलण्यासाठी 2,700 ते 3,000 रुपये भरण्याची सक्ती करण्यात येत असून, निर्धारित मुदतीत मीटर न बदलल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही नोटिसांमधून देण्यात आला आहे.
कळंबोली सेक्टर-4 येथील सुविधा सोसायटीसह एलआयजी, एमआयजी, एलआयसी तसेच के-4 आणि के-एल-1 परिसरातील अनेक ग्राहकांना अशा प्रकारच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ काही घरांपुरता मर्यादित नसून शहरातील मोठ्या संख्येने ग्राहकांना त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मीटर नादुरुस्त कसे ठरले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हे मीटर सिडकोकडूनच पुरविण्यात आलेले असल्याने त्यांच्या तांत्रिक दोषांची जबाबदारी नागरिकांवर टाकणे योग्य नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वारंवार मीटर नादुरुस्त होत असतील तर त्यासाठी सिडको प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, या मीटरप्रकरणामुळे नागरिकांना दुहेरी आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकीकडे नवीन मीटरसाठी हजारो रुपयांची आकारणी केली जात असताना, दुसरीकडे पाण्याच्या बिलांमध्येही वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रफुल देवरे यांनी सांगितले की, कळंबोली शहरात सुमारे 8 हजार पाणी ग्राहक आहेत. अनेक मीटर बंद अवस्थेत आहेत किंवा प्रत्यक्ष पाण्याचा वापर होत असतानाही योग्य नोंद करत नाहीत. अशा तांत्रिक निकषांनुसार संबंधित मीटर फॉल्टी आढळल्याने ग्राहकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनी या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केलेले नसून, मीटरची स्वतंत्र तपासणी, वाढीव बिलांचा पुनर्विचार आणि मीटर बदलण्याच्या शुल्काबाबत सवलत देण्याची मागणी केली आहे. अन्यथा कळंबोलीत व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
दरवर्षी मीटर नादुरुस्त होत असतील तर त्याची जबाबदारी कोणाची? सिडकोकडून तात्काळ मीटर बदलण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी अडीच ते तीन हजार रुपये कुठून आणायचे हा प्रश्न आहे. प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून नागरिकांना दिलासा द्यावा.
– रजनी बने, ग्राहक, कळंबोली






