सिकंदर शेख ठरला विजेता
| चिरनेर | प्रतिनिधी |
कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर जंगी कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेने अक्षरशः मिनी महाराष्ट्र केसरीचा अनुभव उपस्थितांना दिला.
या कुस्ती सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे व अरुण भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश लांडगे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पैलवान व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत नेपाळ, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांतील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतल्याने प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचकारी ठरला.
मुख्य कुस्तीमध्ये रुस्तम-ए-हिंद सिकंदर शेख यांनी पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल लाली चमकोर याला चितपट करून मानाची गदा पटकावली. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांनी बागा सिंघ याच्यावर मात केली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी हिंद केसरी संदीप कुमार याला पराभूत केले. महाराष्ट्र केसरी दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे यांची लढत बरोबरीत सुटली. महिला गटात राष्ट्रीय पदक विजेती एकता शर्मा हिने अमेघा घरत हिला, उपमहाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार हिने पलक यादव हिला, तर नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल रुबी थापा हिने उत्तराखंडच्या कोमल हिला पराभूत केले. या स्पर्धेत जवळपास 75 सामने खेळविण्यात आले होते. विजेत्या मल्लांसाठी तब्बल 15 लाख 55 हजार 555 रुपयांची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली होती.







