| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पाण्याने तुडूंब भरलेल्या काळ नदीमध्ये दोन तरुण अडकले होते. रात्रीची वेळ होती. मदतीसाठी ते धावा करीत होते. अखेर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीने दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री या दोघांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दोघांनी सुटकेचा श्वास घेतला.
आदिल शकील खान आणि शब्बू असे या दोन तरुणांची नावे आहेत. बुधवारी (दि.15) अतिवृष्टी झाली. यामध्ये काळ नदीने रौद्र रुप धारण केले होते. पाण्याने भरलेली नदी ओसंडून वाहत होते. महाड येथे एनडीआरएफ दल तैनात असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फोन वाजला. दोन तरुण काळ नदीत अडकले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून एनडीआरएफ दलाचे प्रमुख सुशांत कुमार सेठी यांच्यासह त्यांचे 30 जवान, बोट घटनास्थळी दाखल झाली. एका बाजूला जोरदार पाऊस पडत असताना पुर्ण काळोख झाला होता. बॅटरीचा आधार घेत बोटीद्वारे तरुणांना शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर नदीच्या लगत झाडाजवळ ते अडकले असल्याचे दिसून आले. अडकलेले तरुण आणि नदीचा काठ यांच्यातील अंदाजे 100 मीटर अंतर होते. एनडीआरएफ पथकाने बोटीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. साडेदहा ते साडेबारा असा दोन तासाचा हा थरार सुरू होता. अखेर त्यांना बोटीमध्ये घेऊन सुखरूप किनारी आणण्यात दलाला यश आले. त्या तरुणांनी सुटकेचा श्वास घेऊन एनडीआरएफ दलाचे आभार व्यक्त केले.
आपत्तीप्रवण गावांमध्ये जनजागृती
रायगड जिल्ह्यामध्ये जूलै महिन्यात अतिवृष्टी होते. या कालावधीत पूरपरिस्थितीसह दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे एक जूलैपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी महाड येथे दाखल झाली आहे. या तुकडीचे प्रमुख मुकेश पुजारी आहेत. त्यांच्यासोबत दोन निरीक्षक, 28 जवान आणि एक श्वान आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या आपत्तीच्या काळात बचावाचे काम या दलामार्फत करण्यात आले. या पथकाने महाड तालुक्यातील आपत्ती प्रवण गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती सुरू केली आहे. तालुक्यातील 14 हून अधिक ठिकाणी आपत्ती प्रवण गावांतील नागरिकांशी संवाद साधत आपत्तीशी सामना कशा पध्दतीने करायचा याची माहिती दिली.




