| पनवेल | वार्ताहर |
अलिबाग येथील मित्रांसोबत आलेल्या एका व्यक्तीला ओएनजीच्या बाजूला असलेल्या ग्रिट्स बारमध्ये मद्यपान करणे महागात पडले आहे. धुम्रपान करण्यासाठी बाहेर आला आणि पुन्हा आत जाताच अंगावरील सोने चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अलिबाग परिसरात राहणारे अमोल पद्माकर पाटील हे कार्लेखिंडीत विला केअर टेकर म्हणून काम करतात. अमोल हे त्यांचे तीन मित्र कल्पेश, अतिश, जयेश असे चौघेजण पनवेल परिसरात कामानिमित्ताने आले होते. यावेळी काम पूर्ण झाल्यानंतर अमोल व तिघेही मित्र संध्याकाळच्या सुमारास पनवेल येथील ओएनजी गेटच्या बाजूला असलेल्या ग्रिट्स बारमध्ये मद्यपान करण्यासाठी गेले होते. यावेळी अमोल यांच्या गळ्यात चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते. काहीवेळाने अमोल बारच्या बाहेर असलेल्या पानटपरीवर धुम्रपान करण्यासाठी आला होता. यावेळी अमोलने त्याचा मित्र असल्याचे समजून समोरच्या व्यक्तीला धक्का दिला व तो खाली पडला. यावेळी त्याठिकाणी किरकोळ झटापट झाली. अमोलने समोरच्या व्यक्तीची माफी मागितली. अमोल पुन्हा बारमध्ये जाऊन बसला. या दरम्यान अमोलने गळ्यात घातलेले चार लाख रुपये किंमतीचे दागिने व मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे समजले. या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.