। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येने असणार्या बोर्लीपंचतन ग्रामपंचायतकडे कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची सोय नाही. त्यामुळे येथील रहदारीच्या रस्त्यांसह नदी, नाले कचराभूमी बनले आहेत. या अस्वच्छतेमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बोर्लीपंचतन गावाजवळ असलेल्या नदी पात्रात व परिसरात स्थानिक गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकत आहेत. या परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. स्वछतेचा संदेश देणार्या ग्रामपंचायतचे या कचर्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे कचरा टाकणार्याला कारवाईची भीतीच नसल्याने येथे कचरा टाकला जात आहे. तसेच, ग्रामपंचायतीमार्फत घंटा गाडी आहे. मात्र, एका गाडीवरती संपूर्ण शहरातील कचर्याचा बोझा असल्याने गाडी निघून गेल्यास स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून कचर्याचे वर्गीकरण न करता प्लास्टिकसह सुका व ओला कचरा थेट नदीपात्र परिसरात टाकला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोस सुरू असून या कचराभूमीमुळे नदीला मोठा धोका पोहोचत आहे. तसेच, हा कचरा नदीपात्र परिसरात टाकल्यामुळे पावसाळ्यादरम्यान नदीचे पाणी वाढले की, तो नदीच्या प्रवाहसह नदीच्या पाण्यात वाहून सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे नदीचे पाणीच नव्हे तर नदी काठावर दोन्ही बाजूला असलेल्या शेतीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.