| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीमधील आर्डे गावामध्ये गेली 2 महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. समाज माध्यमांवर याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जत पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी आर्डे गावात पोहचले. सभापती नमिता घारे यांनी येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रथम ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामपंचायत अधिकारी यांची झाडाझडती घेतली.
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आर्डे गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येची माहिती मिळताच कर्जत पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी आर्डे गावात पोहचले. पंचायत समितीच्या सभापती नमिता सुधाकर घारे आणि गटविकास अधिकारी सुशांत पाटील हे तातडीने थेट गावात पोहचले. गावात सुमारे 1400 ते 1500 नागरिकांची वस्ती असून, लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाजवळ बंधारा उभारून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, अलीकडील काळात पाणी अत्यल्प प्रमाणात येत असल्याने महिलांना पाणी भरण्यासाठी लांब पायपीट करावी लागत होती. कपडे धुण्यासाठीही विहिरी किंवा बंधाऱ्याजवळ जावे लागत होते. या समस्येबाबत ग्रामस्थांनी सभापती नमिता घारे यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत सभापती नमिता घारे यांनी दि.15 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुजित धनगर, विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले, राजपूत यांच्यासह गावात भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होत्या. सभापती आणि गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. याचवेळी रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. ही योजना लवकर पूर्ण करून गावाला नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आले. सभापती नमिता सुधाकर घारे यांनी येत्या काही दिवसांतच पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिस बुबेरे, हरिश्चंद्र वेहळे, ग्रामपंचायत अधिकारी केंद्रे आदी उपस्थित होते.







