| भालनाका | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील भालनाका येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.12) संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांच्या उपस्थितीत जनआधार ग्रामीण सहकारी पतपेढीत पार पडली. या सभेमध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच सभासदांच्या कौटुंबिक यशामध्ये सहभाग नोंदवत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त, वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सभासदांच्या नातवंडांनी शैक्षणिक व इतर क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. विशेष आकर्षण म्हणजे, ज्या सभासदांच्या विवाहास 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा आदर्श दांपत्यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांनी संस्थेच्या वाटचालीची आणि भविष्यातील योजनांची माहिती उपस्थितांना दिली. ठेवीदारांच्या ठेवींवर प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेतून यावेळी बक्षिसांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या विस्तारानुसार यावेळी नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली, तसेच उपस्थित सभासदांकडून संस्थेला 10,262 रुपयांची स्वेच्छा देणगी प्राप्त झाली.







