पंचशील नगरमध्ये वर्चस्वावरून राडा
सहाय्यक आयुक्तांच्या भुमिकेवर संशय
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल परिसरात सध्या अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांचे उदंड पीक आले असून, संपूर्ण परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. केवळ एखादा विशिष्ट भागच नाही, तर नवीन पनवेलमधील विविध मुख्य रस्ते आणि पदपथांवर हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अपंगांच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर टपऱ्या आणि व्यवसायांमुळे स्थानिक रहिवासी आणि पादचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता या टपऱ्यांच्या वर्चस्वावरून गुन्हेगारीही डोके वर काढू लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच पंचशील नगर परिसरात टपऱ्या कोणाच्या लावायच्या आणि जागा कोणाची, यावरून दोन गटांत जोरदार भांडणे झाली होती. या वादाचे पर्यवसान नंतर जबर मारहाणीत झाले असून, याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपऱ्यांच्या या बेकायदेशीर व्यवसायाला आता गुन्हेगारीचे स्वरूप येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संपूर्ण अनधिकृत टपऱ्यांच्या साम्राज्यामागे महिन्याला 5 ते 6 हजार रुपयांची हप्तेखोरी किंवा बेकायदेशीर भाडेवसुली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त रूपाली माने या जेव्हा अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी जातात, तेव्हा त्या या अनधिकृत टपऱ्यांवर ठोस कारवाई करण्याऐवजी तुम्ही कोणाला आणि किती हप्ते देता? याचीच विचारणा जास्त करत असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे. अधिकाऱ्यांच्या अशा भूमिकेमुळेच अतिक्रमण करणाऱ्यांचे धाडस अधिक वाढत चालल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी शिवा कॉम्प्लेक्सच्या बाहेरील टपऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत त्या हटवल्या होत्या. मात्र, प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही धाक नसल्यामुळे अवघ्या काही दिवसांतच या टपऱ्या पुन्हा त्याच ठिकाणी थाटण्यात आल्या आहेत. शिवा कॉम्प्लेक्स आणि पंचशील नगर परिसराप्रमाणेच अभ्युदय बँक परिसरालाही या अतिक्रमणाचा मोठा विळखा बसला असून संपूर्ण नवीन पनवेलमध्येच ही समस्या आता अत्यंत गंभीर बनत चालली आहे. अभ्युदय बँकेच्या समोर तर अपंगांच्या नावाखाली बेकायदेशीर टपऱ्यांची जणू साखळीच तयार झाली आहे. एकाच वेळी एवढे अपंग कुठून आले आणि त्यांना तिथे बसण्यासाठी जागा कोणी दिली? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांना अशा प्रकारे पैसे घेऊन जागा दिली जात असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे सिडको, महापालिका वरिष्ठ प्रशासन आणि पोलिसांनी या हप्तेखोरीची सखोल चौकशी करावी आणि संपूर्ण नवीन पनवेलमधील या टपऱ्यांच्या बेकायदेशीर साम्राज्याविरुद्ध धडक मोहीम उघडावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.






