। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचा तिथीप्रमाणे स्मृतिदिन गुरुवारी (दि.26) नेरळ येथील कोतवाल वाडीमध्ये करण्यात आला. यावेळी भल्या पहाटे नेरळकरांनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन कृषी रत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी केले.
मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे क्रांतिकारक भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना ब्रिटिशांच्या गोळ्यांपुढे आपले प्राण गमवावे लागले. त्यादिवशी 2 जानेवारी 1943 रोजी मार्गशिष एकादशी होती. त्यामुळे नेरळ कोतवाल वाडी ट्रस्टमध्ये या दोन्ही हुतात्म्यांना तिथीप्रमाणे आदरांजली वाहिली जाते. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा 82 वा स्मृतिदिन आज संपन्न झाला. या दोन्ही हुतात्म्यांना पहाटे सहा वाजून दहा मिनिटांनी क्रांतिज्योत पेटवून अभिवादन करण्याची प्रथा स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी 1948 मध्ये सुरू केली होती. आज कोतवाल वाडीमध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील क्रांतिज्योत देशातील आघाडीचे शेतकरी संशोधक शेखर भडसावळे यांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आली. पहाटे सहा वाजता देखील असंख्य नेरळकर आणि देशप्रेमी नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी कोतवाल वाडी ट्रस्टच्या अध्यक्षा संध्या देवस्थळे, माजी अध्यक्ष अनसूया पादिर तसेच विश्वस्त उपस्थित होते.
सुरुवातीला कोतवाल वाडी ट्रस्टचे विश्वस्त बाळकृष्ण पादीर यांनी प्रास्ताविक करताना कृषीभूषण कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर कोतवालवाडी वसतिगृहाचे विद्यार्थी, कोतवाल वाडी ट्रस्ट नर्सिंग विद्यार्थी, नेरळ विद्या मंदिर, नेरळ विद्या विकास मंदिर या शाळांच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केली. तर एनएसएस कॅम्पसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
नुकतेच अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून पर्यावरणपूरक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आणि डॉ. नॉर्मन पुरस्काराने सन्मानित झालेले देशातील पहिले शेतकरी संशोधक पुरस्कार मिळविणारे शेतकरी कृषीरत्न शेखर भडसावळे यांनी आपल्या भाषणात तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे, असे मत मांडले. शेतकरी जगला तरच देश जगणार आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी तरुण वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भडसावळे यांनी मांडले. तर शेती शिवाय तरणोपाय नाही, याबाबत अनेक उदाहरणे देवून भडसावळे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी विभाग किती महत्वाचा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.