नियमानुसार तरतूद नसणार्या बोटीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जल वाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. या संस्थामार्फत ज्या प्रवासी बोटी कार्यरत आहेत, त्यांची तांत्रिक आणि प्रवासी सुरक्षा अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. नियमानुसार तरतूद नसणार्या बोटीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकार्यांनी निर्देश दिले आहेत.
गेट वे मुंबई येथील बोट अपघाताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हयातील ज्या प्रवासी बोटींना परवाना देण्यात आला आहे, त्या बोटींची इनलॅण्ड व्हेसल अॅक्ट, 1917 मधील व परवाना देतानाच्या नियमावलीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची तपासणी मेरिटाईम बोर्डकडून करण्यात येत आहे. अनधिकृत व मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करित असलेल्या बोटींवर तातडीने नियमोचित कारवाई करण्यात येणार आहे.
प्रत्येक जेट्टीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत, याची नोंद संबंधितांनी ठेवावी असे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक बोटीवर लाईफ जॅकेट, रिंग बोयाज, टॉर्च, प्रथमोपचार पेटी, फ्लोटींग रोप इ. सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे, अगर कसे याची तपासणी करण्यात येत आहे. बोटीवर प्रवेश करतानाच प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या सूचना देण्याबाबत संबंधित बोट/फेरी मालकांना देण्यात याव्यात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीवर चढणार नाहीत, याची नियमित तपासणी करण्यात यावी. ऑनबोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा, जेणेकरुन प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल. सर्व प्रवासी बोटींची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या तज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करावी, असे निर्देशदेखील जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले आहेत.
नीलकमल बोटीची प्रवासी क्षमता 80 प्रवासी आणि सहा कर्मचारी अशी होती. असे असताना या बोटीवर अपघातादरम्यान एकूण 110 प्रवासी आणि 5 कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असल्याने नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र बुधवारी निलंबित करण्यात आल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. कोणत्याही बोटीवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी ही तिन्ही प्रमाणपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. ही तिन्ही प्रमाणपत्रे रद्द झाल्याने नीलकमल बोट मालकाविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे जलवाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणार्यांना चपराक बसेल, असेही म्हटले जाता आहे.
नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना निलंबित
गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणार्या नीलकमल बोटीला बुधवारी झालेल्या अपघाताच्या चौकशीअंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळाने अखेर आता नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. तसेच बोटीतील डेकची जबाबदारी असणार्या बोट मास्टर आणि इंजिनची जबाबदारी असणार्या इंजिन ड्रायव्हरची चौकशी सध्या सुरू आहे. यांच्यावरही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका असून चौकशीअंती या दोघांविरोधातही कडक कारवाई करून त्यांचा परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याचे संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.