| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूल अस्तित्व टिकवण्यासाठी आधाराची वाट पाहत उभा आहे. पाच वर्षांपूर्वी अवजड वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच मालाचे कंटेनर वेळेत बंदरात पोहोचावेत, यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. परेंतु, आजघडीला हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वाहनचालक व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता पूलाची दुरवस्था स्पष्ट दिसते. एका बाजूला पूलाच्या मध्यभागी तडे गेले असून तो तब्बल सुमारे एक फूट खचला आहे. तर, दुसऱ्या बाजूला पूलाच्या दोन्ही बाजुचे संरक्षक कठडे तुटले आहेत. तसेच, उड्डाणपूलाच्या दोन्ही टोकाला भल्या मोठ्या भगदाडांची निर्मिती झाली आहे. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद करून फक्त हलकी वाहने सुरू ठेवण्यात आली आहेत. परंतु, पर्यायी व्यवस्था नसल्याने धोका कायम आहे. याआधी 2021 साली द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 15 मध्ये फुंडे गावाजवळील उरण-जुनाशेवा मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टवरून प्रवास करताना अचानक स्लॅब कोसळल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दीपक कसूरकर या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 15 ते 51 मधील सर्व मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासर्वांची दुरुस्तीसाठी निविदा काढली होती. द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपूलांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.






