| वावोशी | प्रतिनिधी |
देशाच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठला असून, एकूण निर्यात मूल्य 72,325.82 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणने जाहीर केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 19.32 लाख मेट्रिक टन सागरी खाद्यपदार्थांची निर्यात झाली आहे.
या निर्यात वाढीमध्ये गोठवलेल्या (फ्रोझन) कोळंबीचा सर्वाधिक वाटा राहिला असून, फक्त कोळंबीने 47,973.13 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. एकूण निर्यात उत्पन्नाच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक योगदान देत कोळंबीने या क्षेत्रातील वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. कोळंबीच्या निर्यातीत परिमाणात 4.60 टक्के तर मूल्याच्या दृष्टीने 6.35 टक्के वाढ नोंदवली गेली. निर्यात बाजारपेठांमध्ये अमेरिका अव्वल स्थानावर कायम असली तरी तेथील निर्यातीत घट दिसून आली. 2.32 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या आयातीसह अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ राहिली; मात्र, परिमाणात 19.80 टक्के आणि मूल्यात 14.50 टक्के घट झाली. यामागे परस्पर शुल्कांचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, चीनसह इतर पर्यायी बाजारपेठांनी दमदार कामगिरी करत ही घट भरून काढली. चीनकडे होणाऱ्या निर्यातीत मूल्याच्या दृष्टीने 22.70 टक्के आणि परिमाणाच्या दृष्टीने 20.10 टक्के वाढ झाली. युरोपियन युनियनमध्येही निर्यात मूल्य 37.9 टक्क्यांनी आणि परिमाण 35.20 टक्क्यांनी वाढले. आग्नेय आशियाई देशांमध्ये अनुक्रमे 36.10 टक्के आणि 28.20 टक्के वाढ नोंदवली गेली. जपानकडे निर्यात मूल्य 6.55 टक्क्यांनी वाढले असले तरी पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे त्या भागात 0.55 टक्क्यांची किरकोळ घट झाली. अनेक नव्या आणि स्वतंत्र बाजारपेठांमध्ये दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेल्याने निर्यातीचे विविधीकरण स्पष्टपणे दिसून येत आहे. लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने विशाखापट्टणम (विझाग), जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी), कोची, कोलकाता आणि चेन्नई या 5 प्रमुख बंदरांचा एकूण निर्यात मूल्यात सुमारे 64 टक्के वाटा असून देशाच्या सागरी निर्यात पुरवठा साखळीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.







