। महाड । प्रतिनिधी ।
महाड-दापोली राज्य मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, मंगळवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास कुर्ला दिवेकरवाडी येथील अवघड वळणावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी, चालक-वाहक तसेच ट्रकचालक जखमी झाले आहेत.
राधाकृष्णवाडी (मुमुर्शी) येथून महाडकडे येणारी एसटी बस कुर्ला दिवेकरवाडी येथील प्रवाशांना घेऊन महाडच्या दिशेने येत होती. याचवेळी महाडकडून दापोलीकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने अवघड वळणावरील उतारात विरुद्ध दिशेने येत एसटी बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील चार प्रवासी, चालक आणि वाहक यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी प्रवाशांमध्ये भूमिका कासारे (21) रा. कुर्ला, महाड यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. काशीराम कुळे (77) रा. करंजाडी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून, पुष्पा यादव (40) रा. कुर्ला, महाड यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तसेच प्रगती कासारे (30) रा. कुर्ला, महाड यांच्या छातीला मुकामार लागला आहे. या अपघातात ट्रकचालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी महाड येथील डॉ. रानडे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाकडून जखमी प्रवाशांना प्रत्येकी 500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. उपचारानंतर जखमी प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती महाड आगारप्रमुख रितेश फुलपगारे आणि ऋतिक चिनके यांनी दिली.







