महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी

सातारा

 । सातारा । वृत्तसंस्था । 

नाताळच्या निमित्ताने आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्‍वमध्ये पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक मोडले आहेत. महाबळेश्‍वर पाचगणी ही गिरीस्थाने यावेळी गजबजून गेली आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. सध्या एकत्रित ग्रुप व खासगी मोटारीतून मोठया प्रमाणात पर्यटक येत आहेत. येथे आता थंडीचा कडाका वाढला आहे. या थंडीसोबतच येथील निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागांमधून मोठया प्रमाणात शालेय सहली व पर्यटक महाबळेश्‍वर येथे दरवर्षी येत असतात. यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने शालेय सहली नाहीत पण त्याची उणीव उच्चांकी गर्दीने भरून काढली आहे. यामुळे मुख्य बाजारपेठ परिसर गजबजून गेला आहे. बाजारपेठेत आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. येथील केट्स पॉइंट, ऑर्थरसीट पॉइंट, विल्सन, मुंबई पॉइंट, क्षेत्र महाबळेश्‍वर, लॉडविक पॉइंट, लिंगमाळा धबधबा, श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिर, किल्ले प्रतापगड येथे पर्यटक गर्दी करीत आहेत. ऐन थंडीत देखील पर्यटक येथील प्रसिद्ध मक्याचे कणीस, स्ट्रॉबेरी जूस, आईस्क्रीमवर ताव मारताना दिसत आहेत.

नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा लेक गर्दीने फुलून गेला असून पर्यटक नौकाविहाराबरोबर घोडेस्वारीचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत. सोबतच वेण्णा लेक चौपाटीवर चमचमीत-चटपटीत पदार्थावर ताव मारला जात आहे. गुलाबी थंडीत वेण्णा लेक वरील निसर्गसौंदर्य व सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी निसर्गाच्या विविध आकर्षक छटा अनुभवताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.

पाचगणीच्या टेबल लँडवर सिडनी पॉईंट आदी ठिकाणी मोठी गर्दी आहे. यावर्षीच्या आल्हाददायक निसर्ग सौंदर्याचा करोना प्रदुर्भावाभावी घरातून सुटका झाल्याने पर्यटक पुरेपूर आनंद लुटत आहेत. महापालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी असल्याने या शहरांतील पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्‍वर,पाचगणी, वाईला पसंती दिली असल्याने चढ्या भावातही हॉटेल्स,रिसॉर्ट, सेकंडहोम , खासगी बंगले,शेतघर हाउसफुल्ल झाले आहेत.

Exit mobile version