| पनवेल | प्रतिनिधी |
वाढत्या उष्म्यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना खांदा वसाहत परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अनेकदा वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवारी (दि.11) महावितरणच्या कारभाराविरोधात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही अंत्ययात्रा सेक्टर-1 मधील महावितरण कार्यालयापर्यंत नेण्यात आली. आंदोलनादरम्यान मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन परिसरात अखंड वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांना 24 तास दर्जेदार वीजपुरवठा देणे महावितरणचे कर्तव्य असून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.







