पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता; स्वच्छता दूतांकडून प्लास्टिकचे संकलन
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानच्या संपूर्ण परिसराला प्लास्टिक कचऱ्याने वेढल्यामुळे याच प्लास्टिकमुळे हवेतील गारवा हळूहळू संपुष्टात येऊन उष्मां जाणवत आहे. माथेरान हे प्लास्टिकमय बनल्याने असंख्य झाडे सुकून चालली असून, अतिवृष्टीत आपोआपच उन्मळून पडताना दिसतात. त्यामुळे विविध ठिकाणी जंगल उजाड होताना दिसून येते. हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पर्यटन लोप पावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन ठेक्यासाठी लाखो रुपयांची उधळण केली जाते. परंतु, सद्यस्थितीत तेवढा कचरा गोळा केला जात नसल्याचे बोलले जात आहे. गावातील होतकरू युवक नेहमीच ह्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना प्लास्टिक गोळा केले जात आहे. नगरपरिषद दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला लाखो रुपये देते तेच काम गावातील स्वच्छता दूतांना दिल्यास गाव निश्चितपणे चकाचक होईल यात तिळमात्र शंकाच नाही असे जेष्ठ नागरिक बोलत आहेत.
काही वर्षांपासून येथील धनगर समाजाचे अध्यक्ष स्वच्छता दूत राकेश कोकळे हे आपल्या मित्र परिवारासोबत वेळ काढून गावातील विविध ठिकाणी पॉईंट्स भागात जाऊन वेळप्रसंगी डोंगर दर्यात उतरून जीवाची पर्वा न करता प्लास्टिक कचऱ्याचे संकलन एक सेवाभावी उपक्रम म्हणून राबवित असतात. वनखाते, नगरपरिषद यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. वन समितीने मागील वर्षांपासून काही महिला कामगार कचरा गोळा करण्यासाठी नियुक्त केलेल्या आहेत. वनसमिती आणि नगरपरिषद यांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यास माथेरान प्लास्टिक मुक्त होऊ शकते. वनसमितीकडे वाहन पार्किंगच्या माध्यमातून लाखो रुपयांची जमा आहे. ही रक्कम स्वच्छतेच्या कामी उपयोगात आणल्यास प्लास्टिकचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ही रक्कम नगरपरिषदेच्या कोणत्याही कामास वापरण्यात येऊ नये असेही बोलले जात आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेने ज्या कचराकुंड्या आणल्या आहेत त्याचा वापर करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या महागड्या कचराकुंड्या कचऱ्यात पडल्या आहेत त्या वनसमितीने पॉईंट्सवरील स्टॉल्सधारकांना दिल्यास पर्यटक जंगलात कचरा फेकणार नाहीत.
वारंवार सांगून सुद्धा अधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या ही बाब लक्षात का येत नाही. नगराध्यक्ष साहेबांना विनंती करतो एकदा फक्त माथेरानच्या पर्यावरणावर लक्ष देऊन माथेरानची वनराई प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करावा.
राकेश कोकळे
स्वच्छतादूत माथेरान







