| आंबेत | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावच्या मुख्य रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, ग्रामस्थ आणि वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासन दरबारी सातत्याने गावकऱ्यांनी पाठपुरावा केला, तरी संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत शासनाचा निषेध केला. पुढील पाच दिवसांत रस्त्याच्या डागडुजीचे काम न झाल्यास तीव्र उपोषण करू, असा थेट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. मेंदडी हे मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदार संघातील गाव असून, गावच्या मुख्य प्रवेश द्वारावर अनेक मोठमोठाले खड्डे पडलेत. एसटी, मिनिडोअर, छोटी मोठी वाहने, मोटारसायकल यांना या रस्त्यावरून सद्यस्थितीमध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लावण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप जैसे थेच परिस्थितीत हा रस्ता दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याला पुढील पाच वर्ष काहीच होणार नसल्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र दोन वर्षांतच रस्त्याची चालण झाली आहे.







