| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा व चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यालगत मार्गावर बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक दुकानदारांनी दुकानातील सामान रस्त्यालगत मांडले आहे. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, पाणीपुरी वाले यांनी गटारांवर कडप्पे टाकून अतिक्रमण केले आहे. तसेच, दुकानदारांनी रस्त्यालगत आपल्या दुकानाच्या जाहीरातीचे फलक लावले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. याची दखल घेत माहोपाडा व चांभार्ली ग्रामपंचायत आणि रसायनी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने बाजारपेठ व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी दुकानालगत असणारे फलक व रस्त्यावर आलेला दुकानातील माल हटविण्यात आला. तसेच, ग्रामपंचायत वासांबे व रसायनी पोलीस प्रशासनाकडून रस्त्यालगत अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले. यावेळी रसायनीचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ, वाहतूक पोलीस अधिकारी डोके बापू, माजी सरपंच संदीप मुंढे, व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी दुकानदारांना समज दिली.






