। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलिसांनी चांभार्ली परिसरातील एका बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकत धडक कारवाई केली. देहविक्री अड्डा उध्वस्त करुन या कारवाईत मुख्य सूत्रधार असलेली नीता गायकवाड (36) हिला अटक करण्यात आली असून, तिच्या पर्समधून रोख रक्कम चार हजार तसेच इतर साहित्य बेडरूममधून ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी तीन पीडित मुलींचीही सुटका करण्यात आली आहे.
प्राथमिक पोलीस तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, आरोपी नीता गायकवाड ही चांभार्ली परिसरातील एका बिल्डिंगमध्ये भाडेतत्त्वावर राहत होती. ती नोकरी व पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन व तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होती. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा उचलत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका करत होती. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी खालील मुलींची सुटका केली. (नावे बदललेली) पूजा (23) राणी (28) मोनाली (वय 16 वर्षे 5 महिने) असून, एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याचे समोर आल्याने गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. गुप्त माहितीच्या आधारे रसायनी पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. घटनास्थळावरून तीन पीडित मुलींना ताब्यात घेऊन त्यांना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेची माहिती प्राप्त होताच खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक मोहीम यशस्वी केली. या गांभीर्यपूर्वक घटनेची तक्रार रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनम शेळके यांनी दिली असून, या कारवाईमुळे रसायनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ हे करीत आहेत.







