। पनवेल । प्रतिनिधी ।
एसटी बस किंचित घासल्याच्या किरकोळ कारणावरून एका माथेफिरू रिक्षाचालकाने थेट एसटी बसचालकाच्या डोक्यात हातोडीने घाव घालत जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना पनवेलमधील तक्का सिग्नल परिसरात घडली. या हल्ल्यात एसटी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी आरोपी रिक्षाचालकाला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
विटा-मुंबई मार्गावरील एसटी बस पनवेलमधील शिवशंभो नाका येथील चौकात आली. तेव्हा एसटी बस एका रिक्षाला किंचित घासली गेली. या घटनेनंतर बसचालक आणि रिक्षाचालक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रिक्षाचालक विलास म्हात्रे याने संतापाच्या भरात हातोडी काढून थेट बसचालकाच्या डोक्यावर हल्ला केला. हातोडीचा जोरदार फटका बसल्याने चालक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेनंतर जखमी चालकाला तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एसटी बसच्या चालकावर झालेला जीवघेणा हल्ला पाहून बसमधील प्रवासी आणि परिसरातील नागरिकांनी आरोपी रिक्षाचालक विलास याला पकडून चांगलाच चोप दिला. या प्रकारामुळे तक्का सिग्नल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पनवेल शहर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.






