हजारो लिटर पाणी रस्त्यावर
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा- कोलाड रस्त्यालगत असलेल्या एक्सेल नाक्यावर जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर येऊन याठिकाणी डबक्याचे स्वरूप आले आहे. गेली पाच दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावर इतरत्र पसरलेल्या खराब पाण्यातून कामगार, वाहनचालकांना जावे लागत आहे.
एकीकडे कडक उन्हाची झळ लागत असताना नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे केवळ गळतीमुळे रस्त्यावर पिण्याचे पाणी पसरल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत असल्यामुळे याठिकाणी प्रशासकीय अनास्थेचा कामगार, वाहनचालकांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचेही याठिकाणी दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.
रोहा- कोलाड रस्त्यालगत एक्सेल नाक्यावरून रोहे शहराला आणि साळाव येथील जे.एस.डब्ल्यू कंपनीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी याठिकाणावरून गेलेली आहे. ही जलवाहिनी रस्तामध्येच फुटल्याने गेली पाच दिवसांपासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकारही घडले आहेत. अशा परिस्थितीत शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि इथे हजारो लिटर पाणी वाया जात आहे, हे पाहून मन विषण्ण होते, अशी भावना कामगार वर्गाबरोबर परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. याठिकाणी सतत रहदारी सुरू असल्यामुळे आणि रस्त्यावर पाणी साचल्याने याठिकाणी वाहने संथ गतीने जात असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ऑफिसच्या वेळेत या भागात मोठी वाहतूक कोंडी होते. जर तातडीने या जलवाहिनीचे काम झाले नाही तर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकाराबाबत रस्त्यावरील जल वाहिनीला गळती असल्याने सर्व पाणी रोहा औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर पसरलेला असून, मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी, आपणांस विनंती करण्यात येते की, सदर गळती झालेल्या ठिकाणी पाहणी करुन, वाहिनीची तपासणी करुन नादुरुस्त वाहिनीची गळती काढून घेण्यात यावे. जेणे करुन पाणी वाया जाणार नाही अशा आशयाचे एक पत्र रोहा अष्टमी नगर पालिका आणि साळाव येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी प्रशासनाला रोहा औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत देण्यात आले असल्याचे अधिकारी विनीत कांदळगावकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या गंभीर विषयावर आता संबंधित वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलतात आणि पाण्याची ही नासाडी कधी थांबते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







