प्रशासनाचा संथ कारभार; नागरिकांचा संताप
। चणेरा । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची गावाकडे मोठी लगबग सुरू असतानाच तालुक्यातील महत्त्वाचा रोहा–तांबडी मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याची दयनीय अवस्था प्रशासनाने मान्य करूनही प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल झाले आहेत. तांबडी, गौळवाडी, सवाणे, म्हसाडी, बारशेत यासह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांची रोहा बाजारपेठेत रोजची वर्दळ वाढणार आहे. मात्र ज्या रस्त्यावरून हजारो नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे, तोच रस्ता सध्या जीवघेण्या खड्ड्यांनी व्यापलेला आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात दगड-मातीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. प्रवास काही किलोमीटरचा असला तरी खड्ड्यांमुळे तो नागरिकांसाठी मनस्तापाचा आणि धोक्याचा ठरत आहे.
विशेष म्हणजे, रस्त्याची दुरवस्था प्रशासनाने मान्य केली आहे. खड्डे बुजविण्याचे आश्वासनही देण्यात आले. राजकीय नेत्यांकडूनही नागरिकांना आश्वासनांची मलमपट्टी करण्यात आली. मात्र आश्वासनांचे दिवस संपले, तरी रस्त्यावरील खड्डे मात्र जैसे थे! यामुळे नागरिकांचा संताप आता उफाळून येत आहे. “आश्वासनांची खैरात नको; रस्त्यावर प्रत्यक्ष काम कधी सुरू करणार?” असा थेट सवाल नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. चाकरमानी, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असताना रस्ता सुरक्षित करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र प्रशासनाच्या संथ कारभारामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
रस्ता खराब असल्याचे प्रशासनाला माहिती आहे, नागरिकांचा त्रास प्रशासनाला माहिती आहे, गणेशोत्सवातील वाढणारी वाहतूकही प्रशासनाला माहिती आहे; मग काम सुरू करण्यासाठी आणखी कोणत्या दुर्घटनेची प्रतीक्षा केली जात आहे? असा सवाल आता नागरिकांमधून जोर धरू लागला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी रोहा–तांबडी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा केवळ आश्वासने देणाऱ्या राजकीय नेत्यांसह संबंधित प्रशासनालाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या आधी रस्ता दुरुस्त होणार की पुन्हा आश्वासनांचीच आरती ओवाळली जाणार? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.





