| महाड | वार्ताहर |
महाड शहर परिसरात सुरू असलेल्या घरफोडींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाड पोलीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. रात्रीच्या विशेष गस्तीपथकामध्ये आता वाढ करण्यात आल्याची माहिती महाड शहर पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
महाडमध्ये गेल्या वर्षभरापासून काही ठराविक कालांतराने घरफोडीचे सत्र सुरू असून मागील काही काळ त्यावर आळा बसलेला असतानाच चालू डिसेंबर महिन्यात किल्ले रायगड रस्त्यावरील साईआशा कॉम्प्लेक्समधील एकाच वेळी सहा फ्लॅट त्याचप्रमाणे मागील आठवड्यात महाड नवेनगर परिसरातील ग्रीनपार्क सोसायटीमधील दोन फ्लॅट चोरट्यानी फोडले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच रहिवाशी सोसायटींसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करून छापील पत्रकांचेदेखील वाटप करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक नेमणे, सीसीटीव्ही बसविणे, सोसायटीतील बंद घरांची माहिती पोलिसांना देणे, इत्यादी आवश्यक सूचनांचा समावेश होता.गेल्या वर्षभरापासून पोलिसांची रात्रीची गस्त सुरू होतीच मात्र सध्या पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढल्यामुळे या चोर्यांना प्रतिबंध व्हावा या हेतूने पोलिसांनी आता ही रात्रीची गस्त अधिकच वाढवली असून शहरातील संपूर्ण भागात आता पोलीस अधिकार्यांसह दुचाकीवरील काही विशेष पोलीसपथके रात्रीच्या वेळेस तैनात करण्यात आली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांनी स्वतः या पथकांसह रात्रीची गस्त सुरू केली आहे.