| चिरनेर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात शिक्षक दिन तथा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्टाफ वेल्फेअर कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर म्हणाले की, अशैक्षणिक कामांच्या ओझ्याने प्राथमिक शिक्षणाची हेळसांड चालू असताना महाविद्यालयीन स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी वाढलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी, कौशल्य विकास,भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन आणि संशोधन यांसारख्या अनेक गोष्टींची आव्हाने समोर असताना उच्च शिक्षण क्षेत्रात काम करत असणारे शिक्षकांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व मोठे आहे, त्याकरिता शिक्षकांनी स्वतःचा व्यासंग वाढवणे आवश्यक आहे. समाजात अजूनही शिक्षकांकडे आशेने पाहिले जाते. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजही शिक्षकांकडेच आशेचा किरण किंवा खरे मार्गदर्शक म्हणून बघितले जात आहे, असेही ते म्हणाले.






