| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील महिलांनी मैत्री ग्रुप स्थापन केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात शहरातील महिला तरुणींसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शहरातील असेम्ब्ली हॉलच्या पटांगणावर पार पडली. यावेळी ही स्पर्धा सरस्वती विद्यालयाच्या ग्रुपने जिंकली.
या स्पर्धेची सुरुवात मैत्री ग्रुप सदस्यांनी दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर हिरकणी ग्रुपने गणेशावंदना सादर करून सुरवात केली. यावर्षी प्रथमच माथेरान डोंगरातील आदिवासी वाड्यांमधील महिला आणि तरुणी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात नाविन्य म्हणजे कशाच्या पट्टीच्या आदिवासी महिलांनी देखील सहभाग घेत स्पर्धेला रंग भरला. यावेळी परीक्षक म्हणून मुंबई वरून आलेल्या “स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो हयो कोकण” या गाजलेल्या गाण्याच्या सह गायिका उज्जवला सुकाळी आणि श्रीलक्ष्मी सावंत या उपस्थितीत होत्या. या स्पर्धेत एकूण सात ग्रुप स्पर्धेमध्ये उतरले होते. तसेच, सूत्रसंचालन स्नेहा चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला माथेरानमधील सर्व समाजातील महिलांनी आणि तरुण मुलींनी उपस्थिती दर्शवली. सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी मैत्री ग्रुप तर्फे प्रत्येक समाजातील महिला अध्यक्षांचा आणि नगरसेविकेंचा सत्कार करण्यात आला.






