| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या जवळच लहान होड्यांमधून मच्छिमारांनी मासेमारी सुरू केली आहे. समुद्राचे पाणी थोडे शांत झाले असल्यामुळे सध्या मासेमारी करण्यासाठी चांगली वेळ आहे. खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीची बंदी 15 ऑगस्ट रोजी उठली असली तरीही, नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतरच मच्छिमार बांधव खोल समुद्रातील मच्छिमारी चालू करतील. सध्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळच मुबलक प्रमाणात मच्छी सापडत आहे.
यामध्ये खास करून कोळंबी, बोंबील, ढोमा, मांदेली, बिलिज, बोईट इत्यादी मच्छी बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे पापलेट देखील चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मच्छीची आवक बाजारामध्ये वाढलेली असली तरीही मच्छीचे भाव मात्र, गगनाला भिडलेले आहेत. दरवेळेला 900 ते 800 रुपये किलो असलेले पापलेट या वेळेला बाराशे रुपये किलोनी विकले जात आहे. तर तीनशे ते साडेतीनशे रुपयांना मिळणारी कोळंबी ही 400, 450 व 500 च्या भावानी साईज प्रमाणे विकली जात आहे. डिझेलचे वाढलेले दर, होड्यांना लागणारा दुरुस्तीसाठीचा खर्च, त्याचप्रमाणे खलाशांची मजुरी या सर्वांमध्ये वाढ झाल्यामुळे माशांचे भाव वाढले असल्याचे बोलले जात आहे.







