। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या देशात महागाई पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम या महागाईवर झाला आहे. त्यातच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. अमूलपाठोपाठ मदर डेअरी आणि वेरका यांसारख्या प्रमुख दुग्ध कंपन्यांनी दूधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे सर्व नवीन दर आज गुरुवार दि.14 मेपासून सर्वत्र लागू झाले असून हा बदल देशभरात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
मदर डेअरी आणि अमूलने दिलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या किंमतीत सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या आणि देखभालीच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. तसेच वाहतूक आणि प्रक्रिया खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी हा बोजा ग्राहकांच्या खांद्यावर टाकला आहे.
ही दरवाढ देशभरात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही शहरातील किंवा राज्यातील ग्राहकांना अमूलचे दूध खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट बिघडणार आहे. तसेच, या दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यवसाय आणि मिठाई उत्पादनांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सकाळच्या चहापासून ते मिठाईपर्यंत सर्वच गोष्टी आता महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत ही दोन रूपयांची वाढही सर्व सामान्यांसाठी न परवडणारीच म्हणावी लागेल.





