मानद डॉक्टरेट पदवीसह प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागचे सुपुत्र आणि सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ॲड. गौतम पाटील यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या बहुआयामी आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या ‘वर्ल्ड स्कूल समिट’मध्ये ‘आऊटस्टँडिंग एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटर’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
शनिवार, दि. 30 मे रोजी बँकॉक येथील आलिशान मॅरियट मार्क्विस क्विन्स पार्क हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्या हस्ते ॲड. गौतम पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि नेतृत्वक्षम योगदानाचा गौरव म्हणून अमेरिकेतील मेरीलँड स्टेट युनिव्हर्सिटीकडून त्यांना ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन एज्युकेशन’ ही मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. या समारंभाला जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तब्बल 40 देशांतील कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
‘वर्ल्ड स्कूल समिट’ हे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्रशासक, संशोधक आणि नवोन्मेषक यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. ज्ञानविनिमय, शैक्षणिक सहकार्य आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव या माध्यमातून जगभरातील शिक्षणव्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्याचे कार्य ही संस्था करत आहे. लंडनमधील प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्ससह भारत, मलेशिया, दुबई आणि बँकॉक येथे यशस्वी अधिवेशने आयोजित करून या व्यासपीठाने जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे.
ॲड. गौतम पाटील यांनी वकिली व्यवसायात प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती आणि समाजहिताचा दृष्टिकोन जपत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. कायद्याच्या क्षेत्रासोबतच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, करिअर सल्ला आणि प्रेरणादायी व्याख्यानांच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे. उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असून, युवकांनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक सबलीकरणालाही महत्त्व द्यावे, हा संदेश ते विविध उपक्रमांमधून देत असतात. सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताच्या उपक्रमांत त्यांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची जागतिक स्तरावर झालेली दखल आणि प्रदान करण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी हा त्यांच्या कार्याचा गौरव असून, अनेक युवकांसाठी ती प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे. मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची तळमळ यांच्या बळावर यशाची सर्वोच्च शिखरे गाठता येतात, हे ॲड. गौतम पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी हा पुरस्कार आपल्या कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांना समर्पित केला. आगामी काळात शिक्षण, समाजसेवा आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
ॲड. गौतम पाटील यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्था, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या या यशामुळे अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे







