हेरवाडमध्ये ठेकेदाराचा मुजोरपणा…!


शिरोळ | प्रतिनिधी | 
 

मागील अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या घोसरवाड-हेरवाड-मजरेवाडी-दत्त कॉलेज या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यासाठी मुरुमा ऐवजी चक्क झाझवट वापरला आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी टाकण्यात आलेला झाझवट काढून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या, मात्र संबंधित ठेकेदाराने झाझवट न काढता मुजोरपणाने त्यावर रोलिंग केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेला केराची टोपली दाखविली आहे. रस्त्याच्या कामात दोष असून सुद्धा मुजोरपणाने संबंधित ठेकेदार हा रस्ता करत असल्याने याकडे आता कोण लक्ष देणार ? असा सवाल वाहनधारकातून उपस्थित होत आहे. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई व्हावी ,अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे यांनी दिला आहे. 

घोसरवाड-हेरवाड-मजरेवाडी-दत्त कॉलेज या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अर्थसंकल्पातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यातील रस्ता हेरवाड-मजरेवाडी दरम्यान करण्यात येत आहे. या रस्त्यामध्ये मुरमा ऐवजी झाझवट टाकण्यात येत असल्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत होते. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी संबंधित ठेकेदाराला झाझवट काढून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या, मात्र ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या सूचनेला केराची टोपली दाखवून रस्त्यासाठी झाझवट वापरून रस्‍ता मुरमीकरण सुरू केल्याने संबंधित ठेकेदारांचा मुजोरपणा आता समोर आला आहे. त्यामुळे सदरच्या ठेकेदारावर कारवाई करून रस्त्यासाठी वापरण्यात आलेले झाझवट काढून त्या ठिकाणी मुरूम वापरण्यात यावे, अन्यथा हेरवाड येथे रस्त्याचे काम बंद पाडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे यांनी दिला आहे. 

कारवाईकडे लक्ष 
शासनाच्या निधीतून करण्यात येणारे रस्ते हे चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून यावर नजर ठेवण्यात येते. वेळोवेळी रस्त्याच्या कामाची पाहणीही केली जाते, रस्ता कामात भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकारी बांधकाम विभागाला आहेत. मात्र हेरवाड येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात कसूर असून सुद्धा बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनेला संबंधित ठेकेदाराने न जुमानता रस्त्याचे काम सुरू केल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version