| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील चणेरा बिरवाडीमार्गे पांगळोली ठाकूरवाडीमार्गे उसर हा साडेनऊ किलोमीटरचा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे मागील दोन वर्षांपासून रखडला असल्याने पांगळोली ठाकूरवाडीमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधव आणि भगिनींना चिखल तुडवत पायपीट करावी लागत आहे.
या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन आमदार पंडित पाटील तसेच शेकाप आमदार जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला होता. या रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीला या कामाचा ठेका 2021-22 मध्ये मिळाला आहे. पण, अद्यापपर्यंत सदर ठेकेदाराने कामाची वर्क ऑर्डर तयार करून घेतलेली नाही. सदर काम मंजूर असल्याने या रस्त्यावर पुन्हा निधी खर्च करता येत नाही. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले असून, सदर खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ठेकेदाराला कळविले आहे. पण, ठेकेदाराने मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविलेल्या पत्राला नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. कमी दराने निविदा भरून काम मिळवायचे, पण काम करायचे नाही, अशीच या ठेकेदाराची काम करण्याची पद्धत दिसून येत आहे.
ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे आदिवासी समाजातील महिला भगिनी, पुरुष, वृद्ध, विद्यार्थी या सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 15 ऑगस्ट पर्यंत संबंधित ठेकेदाराने कामाची वर्क ऑर्डर घेऊन रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत, तसेच आगामी पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी पांगळोली ठाकूरवाडी येथील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात उपोषणाला बसणार असल्याची माहिती शेकाप अनुसूचित जमाती सेल सदस्य समीर वारगुडे यांनी दिली आहे.