रसायनी पोलिसांची कामगिरी
। रसायनी । प्रतिनिधी ।
हिरानंदानी फॉर्च्यून सिटी येथील सोशल हाऊसिंग सोसायटीच्या बांधकाम साइटवरून सहा लाख तीस हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम सेंट्रिंग प्लेट चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना रसायनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण व टायर्सच्या खुणांच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा 24 तासांच्या आत लावला.
रसायनी घोसाळवाडी भोकरपाडा हद्दीतील हिरानंदानी फॉर्च्यून सिटी येथे टेम्पोमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सहा लाख तीस हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम प्लेट्स लंपास केल्या होत्या. याप्रकरणी सिक्युरिटी सुपरवायझर सुरेश सिंह यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी मुंबई-पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले.
तपासासाठी दोन तपास पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी सीबीडी बेलापूर परिसरातून विकास रामपाल वाल्मीकी (वय 26, रा. सीबीडी बेलापूर), आंताउल्ला ऊर्फ यासीन अमजअली खान (25, रा. पळस्पे, पनवेल) या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. रसायनी पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींना जेरबंद करुन चोरीस गेलेला माल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कोळेकर, पोलीस नितिन शेडगे, गिरीष नगरकर, रविंद्र कुंभार, सचिन चौरे, हेमंत कोकाटे, सुशांक पिंगळे आदींनी कारवाई केली.






