सुरज पवारने केली फसवणूक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत आवाज उठविल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार कायम करण्याच्या नावाखाली दिड कोटीच्या फसवणूक प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणार्या 58 परिचारीका व अधिपरिचारक यांची कायमस्वरुपी नियुक्ती करुन देतो असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करून सुमारे 1 कोटी 59 लाख 50 हजार पसार झाल्याची घटना घडली होती.
सुरज धनाजी पवार (वय- 32, रा- सारसोली, रोहा) असे फसवणूक करुन पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो ब्रदर म्हणून मुरुड रुग्णालयात कार्यरत आहे. त्याने एका व्हाटस् अॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व परिचारीका आणि अधिपरिचारक यांची बैठक घेतली. सर्व परिचारीका आणि अधिपरिचारक यांना कायमस्वरुपी नियुक्ती प्रक्रीया करुन 2015 ते कायम स्वरुपी नियुक्ती झालेल्या कालावधीमधील सर्व अनुशेष रोख रकमेच्या स्वरुपात मिळणार असल्याचे सांगितले. मात्र ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये द्यावे लागतील असे त्यांने सांगितले. या आधिच्या परिचारीका आणि अधिपरिचारीकांची नियुक्ती झाल्याचा दावा त्याने केल्याने सर्वांचा त्याच्यावर विश्वास बसला. 4 जुन ते 19ऑगस्ट 2021 दरम्यान अधिपरिचारक आकाश सावंत यांच्या घरी आरोपी सुरज पवार याने पैसे घेतले. जिल्हा रुग्णालयात काम करणार्या 58 परिचारीका व अधिपरिचारक यांची कायमस्वरुपी नियुक्ती करुन देतो असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर प्रत्येकी 2 लाख 75 हजार रुपये अशी एकुण 1 कोटी 59 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम त्याने गोळा करुन त्याला दिली. एक महिन्यानंतर कामाचे काय झाले याची विचारणा केली असता त्यांने सुरु असून वेळ लागणार असल्याचे सांगितले. विश्वास बसण्यासाठी तो व्हाटस्अॅप गृपवर आरोग्य मंत्र्यांच्या दालनाचे फोटोही पोस्ट करीत कामाची प्रक्रिया चालू असल्याचे सांगत होता. तसेच त्याने परिचारीका आणि अधिपरिचारक यांच्या नियुक्तीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात केस दाखल केली असल्याची माहिती त्याने दिली.
मात्र बराच कालावधी उलटून गेला तरी कायमस्वरुपी नियुक्ती होत नसल्याने सुरज पवार याने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आले. यांसदर्भात रक्कमेचा अपहार करुन आपली फसवणुक केली असल्याने त्यांनी माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांच्या माध्यमातून आ. जयंत पाटील यांना साकडे घातले. या संदर्भात जयंत पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवित सभागृहाचे लक्ष वेधले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. जयंत पाटील यांना आश्वासन देत यासंदर्भात गुन्हा दाखल करुन नर्सेेसचे पैसे परत मिळवून देणार, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली.
त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी सुरज पवार विरोधात भा.दं.वि.क. 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि दत्तात्रय जाधव हे करीत आहेत. आतापर्यंत 59 फियार्दीच समोर आले असून आणखी 85 जणांची फसवणूक झाली असल्याने दीड कोटी पेक्षा अधिक रकमेची फसवणूक झालेली असल्याचे समजते.