वावेपंचतन येथे विहिरीत बुडून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

| दिघी | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील वावेपंचतन येथे विहिरीत बुडून 11वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 26) दुपारी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. जिगर हरिश्चंद्र ढापले (11) रा. कुणबीवाडी, वावेपंचतन असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिगर व त्याचा चुलत भाऊ संभव सागर ढापले हे दोघे गावातील मंदिराजवळ खेळत होते. खेळता-खेळता दोघेही जवळील विहिरीत पोहण्यासाठी गेले. पोहत असताना जिगरचा पाण्यात तोल जाऊन तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जिगरला बाहेर काढले. मात्र, त्याला तत्काळ उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद दिघी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वावेपंचतन परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version