महिला कर्मचाऱ्यांची पिळवणूक; मनसेच्या आंदोलनाने शिक्षण संस्था वठणीवर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील घोटावडे गावाजवळील श्री राज एज्युकेशन सेंटर स्कूलमध्ये 17 महिला कर्मचाऱ्यांना 12 तास काम करून केवळ 8 तासांचा मोबदला मिळत आहे. यासंदर्भात नुकतेच मनसे रायगड जिल्हा महिला पदाधिकारी व मनसे सुधागड तालुका महिला अध्यक्षा हर्षदा शिंदे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलन केले. यावेळी महिलांचा पगार वाढविणार असल्याचे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले.
गेली 10 ते 12 वर्षे या महिला येथे प्रामाणिकपणे काम करून त्यांना दिवसाला हजेरी 160 ते 240 एवढीच दिली जात आहे. हजेरी कमी देऊन कामाचे तासदेखील वाढवले जात आहेत. या घडणाऱ्या प्रकारची माहिती 17 महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधागड तालुका अध्यक्षा हर्षदा शिंदे यांना दिली. ताबडतोब हर्षदा शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज एज्युकेशन सेंटरचे सीईओ जे.के. जोशी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी या विषयासंदर्भात जाब विचारण्यात आला. त्यानंतर लागलीच जे.के. जोशी यांच्याकडून येत्या एप्रिल महिन्यापासून महिलांच्या पगारात वाढ होईल, असे आश्वसन देण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांना न्याय मिळाला असून, त्यांनी मनसे सुधागड तालुकाध्यक्षा हर्षदा शिंदे व मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले.
या बैठकीवेळी मनसे रायगड जिल्हा अध्यक्षा सपना राऊत, उपाध्यक्षा छाया शिंदे, सुधागड तालुका अध्यक्षा हर्षदा शिंदे व महिला कामगार उपस्थित होत्या.
