सर्वाधिक नोंदी तळा तालुक्यात; कर्जतमध्ये कुणबी नाही
| रायगड | खास प्रतिनिधी |
मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात 82 हजार 244 नोंदी सापडल्या असून, त्या ऑनलाईन संकेतस्थळावर समाविष्ट करण्यात आले आहे. शासकीय दस्तावेजानुसार पडताळणीत 1311 मोडी लिपीतील, तर मराठीत 16 हजार 666 नोंदी आढळल्या आहेत. मोडी लिपी वाचकांच्या मदतीने पडताळणीचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.
सर्वाधिक नोंदी या तळा तालुक्यात सापडल्या आहेत, तर कर्जत तालुक्यात एकही नोंद सापडलेली नाही. अलीकडेच शिंदे समितीचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शोधमोहिमेत मोडी आणि उर्दू भाषेतील नोंदी मराठीत भाषांतरीत करण्याचा विषय मांडला गेला होता. संबंधित वाचकांना मानधन, कुणबी नोंदी स्कॅन करून त्या संकेत स्थळावर समाविष्ट करण्यात निधीची कमतरतादेखील मांडली गेली होती. समितीने इतर लिपीतील नोंदीबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घ्यावी, असे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर नोंदणी शोधणे व ऑनलाईन समाविष्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या मोहिमेंतर्गत 82 हजार 244 नोंदी आढळल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक (प्राथमिक) अभिलेखावरुन 38 हजार 742, शैक्षणिक (माध्यमिक) अभिलेखावरुन 397, कारागृह अधीक्षक 310, मुद्रांक जिल्हाधिकारी 2791 नोंदींचा समावेश आहे.
सर्वाधिक नोंदी आढळल्या तळा तालुक्यात
तळा तालुक्यात सर्वाधिक 9956 नोंदी आढळल्या आहेत. माणगाव 9380, श्रीवर्धन 8441, म्हसळा 5515, महाड 3187, रोहा 1150, मुरुड 901, पोलादपूर 313, अलिबाग 190, पेण 109, उरण 44, खालापूर 17, सुधागड 3, कर्जत तालुक्यात एकही नोंद सापडली नाही.
संकेतस्थळावर तपासण्याची व्यवस्था
आपली कुणबीची नोंद आहे की नाही, हे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तशी सोय करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना आपली नोंद शोधता येईल. तशी नोंद सापडल्यास त्या पुराव्याच्या आधारे संबंधित नागरिक कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करू शकणार आहेत.