विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज
पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूलच्या सहलीसाठी आलेल्या दोन बसमधील 103 विद्यार्थी व कर्मचारी यांना रात्रीच्या मुक्कामासाठी थांबल्यानंतर भोजनाची व्यवस्थाही तिथेच करण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या भोजनानंतर 103 पैकी 28 विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याने अत्यवस्थ वाटू लागले. सकाळी 8 वाजता पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघतकर व आयुष डॉ. सलागरे यांनी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले.
या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, उपनिरीक्षक उदय धुमासकर यांच्यासोबत सर्व पोलीस कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. यावेळी मिलिटरी स्कूलच्या सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांनी बाधित विद्यार्थ्यांनी रात्रीच्या भोजनानंतर स्टिंग व इतर शीतपेयांचे सेवन केल्याने तसेच दिवसभराच्या अतिप्रवासामुळे हा त्रास झाल्याचे सांगितले. बाधित विद्यार्थ्यांचे उलटी व संडासाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार असून, या विषबाधेची कारणमीमांसा झाल्यानंतर दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलादपूर पोलिसांकडून सांगण्यात आले.
महाड उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर बानापुरे व पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच, बुधवारी 103 पैकी 75 विद्यार्थ्यांसह काही कर्मचारी पुढील सहलीसाठी रवाना झाले तर उर्वरित 28 विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ग्रामीण रुग्णालयामधून सोडण्यात आल्यानंतर पुढील 1 तास कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रवासाला जाण्यास त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने अनुकूलता दर्शविली.
पोलादपूर येथील कॅप्टन मोरे सभागृहालगत आइस्क्रीम तसेच बियरशॉपी आणि चणेफुटाणे, लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या शीतपेयांची दुकाने आहेत. त्यामुळे रात्री बाधित विद्यार्थ्यांपैकी कोणत्या दुकानाचे ग्राहक झाल्याने ही दुर्घटना झाली, याबाबत पोलीस तपासात अधिक माहिती उघडकीस येणार आहे.