एसटीच्या उत्पन्नात 14 लाखाची भर

दोन वर्षात एक हजार 107 प्रवासी महाराष्ट्रभर फिरले

| अलिबाग | प्रमोद जाधव |

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने आवडेल तिथे प्रवास योजना सुरु केली. गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या या योजनेचा लाभ घेत दोन वर्षात एक हजार 107 प्रवाशांनी प्रवास केला. यातून एसटीला 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एसटी वेळेवर न लागणे, रस्त्यात बंद पडणे अशा अनेक समस्यांमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे एसटी तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली होती. एसटीतील तोटा भरून काढण्यासाठी आणि एसटीबद्दल प्रवाशांना आकर्षण निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळाने महाराष्ट्रात आवडेल तिथे प्रवास ही योजना काही वर्षापूर्वी सुरु केली. त्यामध्ये चार व सात दिवसांच्या पासाची सुविधा करण्यात आली. साध्या बसमधून चार दिवस प्रवास करण्यासाठी एक हजार 170 रुपये, शिवशाहीसाठी एक हजार 520 रुपये तसेच सात दिवस साध्या बसमधून प्रवासासाठी दोन हजार 40 रुपये व शिवशाहीसाठी तीन हजार 30 रुपये ही सवलत लागू करण्यात आली.

आवडेल तिथे प्रवास या योजनेला जिल्ह्यातील प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एप्रिल 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत एक हजार 107 प्रवाशांनी लाभ घेतला. यातून एसटीला 14 लाख 78 हजार 515 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

आवडेल तिथे प्रवास ही योजना गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी त्यांच्या आवडत्या ठिकाणी सात व चार दिवस सवलतीच्या दरात जात आहेत. यातून एसटीच्या उत्पन्नात भर पडत आहे.

दिपक घोडे – विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ, रायगड विभाग

Exit mobile version