| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन गेली सात दशके महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात धावणार्या एसटी अर्थात लालपरीवर गेल्या महिनाभरापासून नारीकृपा होऊ लागली आहे. राज्य सरकारच्या महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून रायगडात सुमारे 8 लाखाहून अधिक महिलांनी निम्म्या तिकीटात प्रवास केला आहे. यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर लक्ष्मीकृपा झाली आहे.
सर्व प्रकारच्या एसटीतून महिलांना अर्ध तिकीट प्रवास करता येणार असल्याची योजना 17 जानेवारीपासून जिल्ह्यात सुरु झाली. या योजनेला जिल्ह्यातील महिला प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 22 दिवसात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला असून यातून 1 कोटी 22 लाख 99 हजार रुपयांचे उत्पन्न यातून मिळाले आहे. अर्ध तिकीटमुळे महिलांच्या प्रवासात 44 टक्क्यानी वाढ झाली आहे. या लालपरीवर नारी कृपा लाभल्याने ही योजना एसटीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, महाड, माणगाव, कर्जत, श्रीवर्धन, मुरुड, पेण अशी आठ एसटी बस आगार आहेत. या आगारातून 1 लाखापेक्षा अधिक प्रवासी दिवसाला प्रवास करतात. वेगवेगळ्या योजनांमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न एसटीने देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु एसटी कायमच तोट्यातच राहीली आहे. तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न लालपरीने केला. त्यामध्ये मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून एसटी महामंडळाने महिला सन्मान योजना सुरु केली आहे. एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी अर्ध तिकीट काढून प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. एसटीतून प्रवास करण्यासाठी अर्ध तिकीटची सोय केल्याने महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळे महिला एसटीतून प्रवास करण्यावर अधिक भर देऊ लागल्या आहेत. वाट पाहीन पण एसटीनेच जाईन या भुमिकेत महिला प्रवासी असल्याने एसटी भरगच्च भरून निश्चित स्थळी पोहचत असल्याचे चित्र आहे. महिनाभरात आठ लाख महिलांनी लालपरीतून प्रवास केला आहे. या लालपरीवर महिलांची कृपा लाभल्याने एसटीच्या उत्पन्नात देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
खासगी वाहनांना फटका
एसटी बस वेळेवर नसणे, रस्त्यात सतत बंद पडणे अशा अनेक समस्यांमुळे प्रवाशांनी पर्याय म्हणून खासगी वाहनांचा अधार घेण्यास सुरुवात केली. वाढत्या भाडेवाढीमुळे खासगी बसमधून प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत होती. महिला सन्मान योजना अंतर्गत महिला प्रवाशांसाठी अर्ध तिकीट काढून प्रवास करण्याची व्यवस्था केली. या योजनेला महिलांकडून प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम खासगी वाहनांवर झाला. महिलांनी खासगी वाहनांपेक्षा एसटी बसला पसंती दर्शविली. प्रवासी संख्या घटत असल्याने खासगी वाहनांना त्याचा फटका बसत आहे.
महिला सन्मान योजनेला महिला प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला प्रवासी संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. ही योजना एसटीसाठी एक वरदान ठरत आहे. महिला प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा अधिक प्रयत्न केला जाईल.
दीपक घोडे , विभाग नियंत्रक एसटी महामंडळ, रायगड विभाग
मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून महिला सन्मान योजना लागू झाली. या योजनेअंतर्गत महिलांना अर्ध तिकीट प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.
अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग एसटी बस आगार
एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्ध तिकीट प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. एसटीमध्ये महिला प्रवासी वाढल्या आहेत. एसटी महिला प्रवाशांनी भरगच्च भरते.
श्रीकांत पेढवी, वाहक