| रायगड | खास प्रतिनिधी |
ठराविक मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमदील 17 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. राजकारणात सर्वांना समान संधी मिळण्यासाठी तसेच आपल्या समाजाचे प्रतिनीधत्व करता यावे यासाठी ग्रामपंचायतीमध्ये काही जागा आरक्षीत ठेवण्यात येतात. सदस्य ज्या जाती संवर्गातून निवडणूक लढवतात. त्या जातीचे वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या मुदतीमध्ये सादर करणे बंधनकारक असते. मात्र 2019, 2020 आणि 2021 या कालावधीत पार पडलेल्या विविध ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांनी ठराविक मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी सदरच्या सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे.
कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायतीमधील एक सदस्य, तर माणगाव तालुक्यातील पाटणूस आणि तळाशेत मधील दोन सदस्य, रोहा तालुक्यातील चिंचवलि तर्फे आतोणे ग्रामपंचायतीमधील एक सदस्य, न्हावे ग्रामपंचायतीमधील पाच सदस्य, तर ऐनघर ग्रामपंचातीमधील एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्याचप्रमाणे म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी ग्रामपंचायतीमधील तीन सदस्य, पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीमधील एक सदस्य मुरुड तालुक्यातील बार्ली मांडला एक सदस्य, तर उरण तालुक्यातील नागाव येथील दोन सदस्यांना आपले सदस्यत्व गमवावे लागले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय अपात्र झालेल्या सदस्यांना पटला नाही, तर ते याबाबत ते उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.