बळवंत वालेकर यांचे प्रयत्न सार्थकी
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सागरगड-माची येथील आदिवासीवाडी रस्त्यासाठी वन विभागाकडून 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली.
सागरगड-माची येथील आदिवासींना भौतिक सुविधा मिळण्यासाठी कुलाबा वैभव संपादक बळवंत वालेकर हे 21 वर्षे प्रयत्न करत होते.यासाठी त्यांनी नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही निवेदन देऊन सत्यस्थिती स्पष्ट केली होती.त्याची दखल घेत राजभवन कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली.यामध्ये जिल्हा नियोजन समिती,वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा नियोजन समितीने सागरगड माचीसाठी तातडीने 20 लाखांचा निधी मंजूर केला असून,लवकरच या रस्त्याचे काम सुरु केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.