। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्यास मंजुरी मिळाल्यानंतर अर्ज भरण्यास वेग आला आहे. गुरुवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी 240 जागांसाठी थेट सरपंच पदांचे 250 अर्ज दाखल करण्यात आले तर 1 हजार 940 सदस्यपदांसाठी सर्वच तालुक्यातील 1 हजार 226 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी आहे.
सरपंच पदासाठी अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी सात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुरुड तालुक्यातील पाच ग्रा.पं.मध्ये चार अर्ज दाखल झाले. पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 28 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्यात आले. उरणमध्ये 18 पैकी 30 अर्ज सादर झाले. कर्जतच्या सात पैकी 11 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले. खालापूर तालुक्यात 14 पैकी 12 अर्ज सादर करण्यात आले. रोहा तालुक्यात पाचपैकी 11 तर सुधागड तालुक्यातील 14 पैकी 15, माणगावमध्ये 19 पैकी 27, तळा तालुक्यात एकमेव ग्रामपंचायतीसाठी एक अर्ज सादर करण्यात आला. महाड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींसाठी 60 सरपंच पदाचे अर्ज दाखल करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील 16 पैकी नऊ सरपंचपदाचे अर्ज दाखल झाले. म्हसळ्यामध्ये 13 पैकी 13 जागांवर अर्ज दाखल करण्यात आले. श्रीवर्धनमध्ये 13 पैकी 11 अर्ज सादर करण्यात आले. एकुण अर्जांची संख्या 456 एवढी झाली आहे.
त्याचप्रमाणे 240 ग्रामपंचायतींमध्ये 1हजार 940 सदस्यपदांसाठी 1 हजार 226 अर्ज आज सादर करण्यात आले. यात अलिबागमध्ये सहा ग्रापच्या 46 जागांसाठी 38, मुरुड तालुक्यातील पाच ग्रापच्या 39 जागांसाठी 27, पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या 226 जागांपैकी 182 अर्ज सादर करण्यात आले. पनवेलमध्ये 10 ग्रापच्या 59 जागांसाठी सात, उरण तालुक्यातील 18 ग्रापच्या 164 जागांसाठी 133, कर्जत तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या 69 जागांसाठी 74 अर्ज सादर झाले. खालापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या 118 जागांसाठी 79 अर्ज, रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी 37 सदस्यपदांसाठी 33 अर्ज दाखल झाले. सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींपैकी 110 सदस्यपदांसाठी 90 नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. माणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या 167 जागांसाठी 119 अर्ज, तळा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी पाच अर्ज दाखल झाले. महाड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या 549 जागांसाठी 240, त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 116 सदस्यपदांसाठी 30 अर्ज भरण्यात आले. तर म्हसळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींपैकी 97 जागांसाठी 56 अर्ज भरण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या 99 जागांसाठी 61 अर्ज असे एकुण 1 हजार 226 अर्ज सादर करण्यात आले.
आतापर्यंत एकुण अर्जांची संख्या 1 हजार 961 इतकी झाली आहे. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.