| माणगाव | वार्ताहर |
माणगाव येथील एका 40 वर्षीय इसमाचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.14 जुलै रोजी सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची खबर देवानंद बाबुलाल ठाकरे (49) रा.आदर्श समता नगर, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी देवानंद बाबुलाल ठाकरे याचे चुलत भाऊ मयत गोकुळ भीमराव ठाकरे (40) सध्या रा.सिद्धी नगर खांदाड ता. माणगाव, मूळ रा.पांगन, जि.धुळे हे सुभाष आसाराम ठाकरे यांच्या घरासमोर बाहेर जमिनीवर पडलेले होते. त्यास त्यांनी उठविले असता त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही म्हणून फिर्यादी यांनी त्यास उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्री. तुणतुणे हे करीत आहेत.