चिटफंड योजनेत 400 कोटींचा चुना; अनेक कुटुंब देशोधडीला

| उरण | वार्ताहर |

उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारोंच्या संख्येने लोकांनी अमाप पैसे गुंतविले होते. त्यामध्ये फसवणूक झाल्याची घटना घडली असून, त्यामध्ये दोन्ही प्रकरणांत 400 कोटींच्या वर अपहाराची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामधील 100 कोटींची संपत्ती पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. यामध्ये राजकीय, प्रतिष्ठित व पोलिसांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.

बँकेपेक्षा लवकर दुप्पट पैसे मिळत असल्याने हव्यासापोटी अनेकांनी मोठमोठ्या रकमा गुंतविल्या आहेत. सुरुवातीला रकमा परत मिळाल्या; परंतु नंतर देणे थांबविले आहे. नुकतेच नवी पोलिसांनी दोन प्रकार उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये एका प्रकरणात सुप्रिया मंगेश पाटील महिलेस तिच्या सहकार्‍यांसह अटक करण्यात आली आहे. तर, दुसर्‍या प्रकरणात सतीश गावंड याच्यावर उरण व सीबीडी येथे दोन गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी झटपट दुप्पट पैसे देण्याचे आमिषे दाखवीत नागरिकांची फसवणूक केली आहे. सुरुवातीला पैसे मिळत असल्याने काहींनी व्याजाने, दागदागिने गहाण ठेवून तर काहींनी जमीन जुमला विकून लाखो रुपये गुंतविले होते. नंतर पैसे मिळण्याचे बंद झाले. तरीही आपले पैसे मिळतील असा विश्‍वास नागरिकांना वाटत होता. परंतु, तारखांवर तारीख मिळू लागल्यावर नागरिकांचा विश्‍वास उडत गेला.

Exit mobile version