रस्ते दुरुस्तीचा दावा फेल

50 किमीचे रस्ते निधीअभावी नादुरुस्त

| रायगड | प्रमोद जाधव |

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणारे रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त झाल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला. परंतु, हा दावा फेल ठरल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणारे अलिबागसह अन्य तालुक्यातील 50 किलो मीटरचे अंतर्गत रस्ते निधी अभावी नादुरुस्त असल्याची माहिती समोर येत आहे.


रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी आहे. जिल्ह्यात 809 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 1 हजार 800 हून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. त्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित 5 हजार किलो मीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांचे नुतनीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण तसेच दुरुस्तीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जाते. गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले होते. तसेच, जिल्हा परिषद अखत्यारित येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. परंतु, निधी अभावी अनेक भागातील खराब रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणारे 50 किलो मीटरचे रस्ते खराब झाले आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. यंदाही गणेशोत्सवात भक्तांना खडड्यातून प्रवास करण्याची वेळ आली. खड्डेमय रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचो या कालावधीत प्रचंड हाल झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या गलथान कारभाराचा तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

25 लाखाच्या निधीची गरज
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. साकव जीर्ण झाले आहेत. वेळेवर दुरुस्ती न केल्याने या गणेशोत्सवात नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यांना खड्डे चुकवत गावातून वाट काढावी लागत आहे. असे असतानाही ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे 25 लाख रुपयांची गरज असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण भागातील अनेक रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत.

– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version